माझ्या अनुभवातील टाटा समूह आणि श्री. रतन टाटा सर – एक साधेपणातून प्रेरणा देणारे यशस्वी आदर्श

टाटा समूहात काम करणे हे कोणासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय नसेल. टाटा समूह हे एक फक्त नाव किंवा कंपनी नसून, ती तर अशी एक उत्कृष्ट मूल्यसंस्था आहे जी मागील कित्येक वर्षांपासून सॉल्ट पासून सॉफ्टवेअर तयार करत आहे. या समूहाने नेहमीच समाजसेवा, नवप्रवर्तन आणि उत्कृष्टतेचा आदर्श देण्याचे काम केले आहे.

टाटा समूहाची सर्वात मोठी ओळख म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी असलेली बांधिलकी. टाटा ट्रस्ट्स आणि इतर उपक्रमांद्वारे समाजसेवा हे टाटा समूहाचे एक प्रमुख उद्दिष्ट नेहमीच राहिले आहे असे मला वाटते. जेव्हा मी एकदा मागच्या महिन्यात इंटरनेट वरती श्रीमंत लोकांची यादी सर्च करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला टाटांचे नाव लिस्ट मध्ये वरती दिसत नव्हते, पण त्यानंतर मी जेव्हा दुसरी यादी म्हणजेच फिलॉन्थ्रोपिस्ट (परोपकारी वा दान देणाऱ्यांची) जेव्हा मला मिळाली तेव्हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर – १०२ यूएस बिलियन डॉलर्स सहित टाटा समुहाचे नाव दिसले.

श्री. रतन टाटा सर यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाने नेहमीच उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आहे तसेच जागतिक स्थरावर वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यांचा आयुष्यातून भरपूर काही शिकण्यासाठी नेहमीच मिळत राहते.

१. प्रामाणिकपणा : सर रतन टाटा हे नेहमीच नीतिमूल्यांवर आधारित काम करत आले आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सद्सद्विवेकबुद्धी आणि प्रामाणिकपणाला कधीही तिलांजली दिली नाही.

२. सामाजिक दायित्व : टाटा समूहाचा नफा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी वापरला जातो, त्यांची सामाजिक कार्यात रुची आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आपल्याला समाजसेवेची महत्ता शिकवते.

३. आव्हानांचा स्वीकार : रतन टाटा यांनी अनेक आव्हानांचा सामना करून टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले. विशेषतः ‘टाटा नॅनो’ आणि ‘जग्वार लँड रोव्हर’ सारखे धाडसी निर्णय घेतले. यावरून आपण शिकू शकतो की जीवनात आव्हानांपासून घाबरण्याऐवजी त्यांचा स्वीकार करावा आणि संधी शोधावी.

४. विनम्रता आणि साधेपणा : इतक्या मोठ्या यशानंतरही रतन टाटा हे अत्यंत विनम्र आणि साधे राहिले आहेत. त्यांच्या या गुणातून आपल्याला कळते की कितीही यशस्वी झालो तरी विनम्रता कधीही सोडू नये.

५. दीर्घकालीन दृष्टिकोन : रतन टाटा यांनी प्रत्येक निर्णयात दीर्घकालीन विचार केला आहे. उद्योगात फक्त तात्पुरता फायदा बघणारे अनेक असतात,  परंतु टाटा यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले,  ज्यामुळे टाटा समूह दीर्घकाळ टिकला. आपणही आपल्या कामात दीर्घकालीन विचार करून निर्णय घ्यायला शिकावे.

६. शिक्षण आणि नवप्रवर्तनाची महत्ता : रतन टाटा यांचा विश्वास आहे की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे. तसेच, त्यांनी नेहमीच नवप्रवर्तनाला प्रोत्साहन दिले आहे. यावरून आपण शिकू शकतो की सतत शिकणे आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आपल्याला यशस्वी बनवते.

७. लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणे : रतन टाटा यांचा व्यवसाय हा केवळ नफ्यासाठी नसून लोकांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी टाटा समूहाच्या प्रत्येक उपक्रमात लोकांच्या कल्याणाला महत्त्व दिले आहे. आपणही आपले कार्य करताना इतरांच्या भल्याचा विचार केला पाहिजे.

टाटा समूहाशी असलेले माझे नाते फक्त एका कंपनीत काम करणाऱ्याचे नाही, तर मी एक टाटा कुटुंबाचा भाग असल्याची भावना मला नक्कीच होत राहते. एक टाटा समूहाचा कर्मचारी म्हणून मला टाटा समूहाचा भाग असल्याचा नक्कीच अभिमान वाटतो. १५० कोटी+ भारतीय आणि संपूर्ण जगातील करोडों लोकांच्या हृदयात तुम्ही नेहमीच आहात.. भावपूर्ण श्रद्धांजली 🫡

– बळवंत जयवंत गोरड,  वरिष्ठ ए.आय लीड,  टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

Leave a Reply